ज्येष्ठ
**पौर्णिमा** - वटसावित्री व्रतवटपूजनाच्या दिवशी सूर्योदयापासून मध्याह्नापर्यंत म्हणजे सुमारे दुपारी 1.30 वाजेपर्यंत कोणत्याही वेळी वटपूजन करावे.
तसेच हे सौभाग्यव्रत असून त्याच्या संकल्पात सात जन्म हाच पती मिळावा असा संकल्प नाही.
सौभाग्य याचा अर्थ पति, धनधान्य, ऐश्वर्य, आरोग्य, पुत्रपौत्र असा आहे.
वटवृक्षाची पूजा करावी असे सांगितले आहे त्यामुळे त्या वृक्षाच्या फांद्या तोडून आणून त्याची पूजा करू नये.
वडाच्या चित्राची किंवा गंधाने वडाचे झाड काढून सुद्धा पूजा करता येईल.
गरोदर स्त्रीचे स्वास्थ्य ठीक असेल तर ९ व्या महिन्यापर्यंत वटपूजन करू शकते.
वड, पिंपळ, औदुंबर, शमी हे यज्ञीय व पवित्र वृक्ष म्हणून सांगितले आहेत.
यांच्या पूजनाने आपण निसर्गाच्या जवळ जात असतो.
झाडे लावणे जितके महत्त्वाचे त्यापेक्षा त्यांची जोपासना करणे हे अधिक महत्त्वाचे आहे.
हा संदेश सध्याच्या काळाच्या दृष्टीने या व्रतातून मिळतो.
सर्व वृक्षात वटवृक्षाचे आयुष्य जास्त आहे.
पारंब्यांनी त्याचा विस्तार ही खूप होतो.
अशा वटवृक्षात असणाऱ्या ब्रह्मा, सावित्री या देवतांचे पूजन करून मला व पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य, धनधान्य व मुले, नातू यांनी प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे.
अशी श्रद्धेने मागणी या व्रताच्या संकल्पात केली जाते.
व्रताच्या आरंभी संकल्प केला जातो.
हे व्रत मी का करीत आहे, याचा उद्देश व हेतु काय आहे याचे प्रकटीकरण संकल्पात होत असते.
संकल्प म्हणजे हेतूचे प्रकटीकरण आहे.
**संकल्प** - 'मम इहजन्मनि अखंड सौभाग्य पुत्रपौत्र धनधान्य ऐश्वर्य अभिवृद्धयर्थं वटमूले ब्रह्मा सावित्री देवता प्रीत्यर्थं' असा संकल्प आहे.
या संकल्पात सात जन्म हाच पति मिळावा, असा उल्लेख नसताना तसा हेतु आहे असे गृहित धरून या व्रताला झोडपले जाते व टीकाही केली जाते, हे योग्य नाही.
कोणतेही कर्म ज्ञानपूर्वक म्हणजे जाणून घेऊन करावे, असे सर्व ऋषींनी सांगितले आहे. 'यदेव विद्यया करोति तदेव वीर्यवत्तरं भवति' ज्ञानपूर्वक केलेले कर्म प्रभावी व बलवान होते, असे शास्त्र सांगते.
वरील प्रमाणे संकल्पपूर्वक वडाचे पूजन केले जाते, सौभाग्यवाण दिले जाते व दिवसभर उपवास करून दुसऱ्या दिवशी उपवासाचे पारणे केले जाते.
हे वटसावित्रीचे व्रत स्त्रीया अतिशय श्रद्धेने व निष्ठेने करतात.
सावित्रीची कथा वाचली असता लक्षात येते की, सावित्रीच्या गळ्यात सत्यवान बांधला नव्हता.
उलट सत्यवान हा दरिद्री व अल्पायुषी आहे.
असे नारदांनी तिच्या लग्नापूर्वी सांगितले होते.
म्हणून कुटुंबातील सर्वांची इच्छा तिने सत्यवानाशी लग्न करू नये, अशीच होती.
शिवाय सत्यवान काही राजा नव्हता किंवा धनवानही नव्हता.
उलट सावित्री ही अश्वपति राजाची मुलगी म्हणजे राजकन्या होती, असे असूनही "मनाने मी सत्यवानाला वरले आहे व मी त्याच्याशीच विवाह करणार” असे तिने स्पष्टपणे सांगितले.
स्वेच्छेनेच तिने सत्यवानाशी विवाह करण्याचे ठरविले होते.
महान पतिव्रतेत सावित्रीची गणना केली जाते.
ती प्रातः स्मरणीय आहे.
जीवनातील खऱ्या यशासाठी आवश्यक असलेले अनेक गुण, आदर्श सावित्री आपल्यापुढे ठेवते.
स्वेच्छेनेच जाणीवपूर्वक निवडलेल्या पतीच्या सुखदुःखात भागीदार होणे, त्याला संकटातून वाचविण्यासाठी काळालाही आव्हान देण्याची तयारी ठेवणे, त्याची साथ न सोडणे हे स्त्रीचे फार मोठे सद्गुण आहेत.
असे हे सावित्रीव्रत ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी केले जाते.
म्हणून या दिवसाला वटपौर्णिमा असे ही म्हणतात.
असे हे वटसावित्रीचे व्रत सर्वत्र श्रद्धेने केले जाते व पुढे ही सुरु राहील.San Vrat814814 views00 comments3 likes. Post not marked as liked3