दिनांक 7 सप्टेंबर रोजी शनिवारी भाद्रपद शु. चतुर्थीच्या दिवशी भारतात सर्वत्र श्रीगणेश चतुर्थी साजरी केली जाईल.
या दिवशी ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे ४:५० ते दुपारी १:५१ पर्यंत आपल्या आणि गुरुजींच्या सोयीने घरातील पार्थिव गणेशाची स्थापना आणि पूजन करता येईल.
त्याकरिता भद्रादि (विष्टि) कोणतेही कुयोग वर्ज्य करण्याची किंवा विशिष्ट मुहूर्त वेळेची आवश्यकता नाही. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मूर्तिंची प्रतिष्ठापना मध्याह्नानंतर देखील करता येऊ शकते.
गणेश चतुर्थीचे महत्व
भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेश चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी गणपतीची मातीची मूर्ती घरी आणून सिद्धिविनायक या नावाने तिची पूजा केली जाते.
भारतात आणि विशेषत्वाने महाराष्ट्रात गणपतीची अनेक प्रकारे उपासना केली जाते. विविध बाधा दूर होण्यासाठी व मनोकामना पूर्ण होण्यासाठी अनेकजण संकष्टीचे व्रत करतात, विनायकाची पूजा करतात.
विनायक - विघ्नहर्ता
विनायक हे गणेशाचे एक लोकप्रिय नाव आहे. विघ्नहर्ता म्हणून पूजल्या जाणाऱ्या विनायकाला वास्तविक दुर्जनांच्या कार्यात विघ्ने उत्पन्न करण्यासाठी विधात्याने उत्पन्न केले, अशी कथा पुराणांत आहे.
मित, संमित, शाल, कटंकट, कूष्मांड व राजपुत्र या नावाचे सहा विनायक गण याज्ञवल्वयस्मृतीत सांगितले आहेत. हे विनायकगण विघ्नकारी, उपद्रवकारी आणि क्रूर असे आहेत.
पुराणातील कथा
विनायकगण हे विघ्नरूप होते; पण विनायक हा विघ्नहर्ता ठरला. भक्तांना विविध प्रकारच्या सिद्धी प्राप्त करून देणारा तो सिद्धिविनायक बनला. अशा या सिद्धीविनायकाच्या पार्थिव मूर्तिची पूजा भाद्रपदातील गणेश चतुर्थीच्या दिवशी केली जाते.
पूजन विधी आणि नियम
प्रात:कालापासून मध्याह्नापर्यंत कोणत्याही वेळी स्थापना व पूजा करता येते. दुकानातून गणपतीची मूर्ती ८ - १५ दिवस आधी आणू घरामध्ये ठेवता येते. श्रीगणेश चतुर्थीच्या आधी एक दिवस किंवा त्याच दिवशी सकाळी मूर्ती आणावयास पाहिजे असे नाही.
मूर्तीबद्दल मार्गदर्शक तत्वे
- घरातील गणेशमूर्ती जास्तीत जास्त एक वीतभर उंचीची आणि आसनस्थ असावी
- उजव्या सोंडेचा गणपती कडक आणि डाव्या सोंडेचा सौम्य अशी समजूत चुकीची आहे
- समर्थ रामदासांनी गणेशाचे वर्णन करताना आरतीमध्ये "सरळ सोंड वक्रतुण्ड त्रिनयना" असे म्हटले आहे
विसर्जन नियम
गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रतिष्ठापना केलेल्या पार्थिव गणेश मूर्तीचे विसर्जन होणे आवश्यक आहे आणि ते पाण्यामध्ये करावे असे धर्मशास्त्र सांगते.
- वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावे असे नसून पाण्यात विसर्जन करावे
- तलावात किंवा स्वतंत्र टॅंकमध्ये, तसेच घरी मोठ्या बादलीमधील पाण्यात सुद्धा विसर्जन करता येते
- विसर्जनानंतर ती मूर्ती पाण्यात विरघळणे आवश्यक असल्याने शाडूची किंवा मातीची मूर्ती असावी
- प्लॅस्टर ऑफ पॅरिस किंवा तत्सम पाण्यात न विरघळणाऱ्या पदार्थांची मूर्ती नसावी
महत्वाचे दिवस - गणेशोत्सव 2024
पूजनासाठी आवश्यक साहित्य
- हळद-कुंकू - पूजेसाठी
- अष्टगंध/शेंदूर - गणपतीसाठी
- उगाळलेले गंध/चंदन - आरतीसाठी
- कापसाची वस्त्रे - कापसाची माळ
- पत्री/पाने - विविध झाडांची पाने (तुळस, शमी, आघाडा)
- हार/फुलं - लाल रंगाची फुलं
- दूर्वा - गणपतीसाठी विशेष
- विड्याची पाने - १० पाने
- सुपारी - पांढरी सुपारी ५
- खारीक/बदाम - प्रत्येकी ५
- खोबरे/नारळ - १
- गुळाचा खडा - नैवेद्यासाठी
- पंचामृत/अत्तर/जानवं - पूजेसाठी
- फळं - ५ फळे
- नैवेद्य - मोदक, पेढे, पंचखाद्य
- नाणी - एक रुपयाची ५/६ नाणी
- ताम्हन/पळी - प्रत्येकी २
- तांबे/निरांजन - ३ तांबे
- रेशमी वस्त्र - गणपतीसाठी
- आसन/पाट - २ पाटी
- पातेलं - पाणी टाकण्यासाठी
गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!